ट्रु कॉलर, ओएलएक्स, कस्टमर केअर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून ऑनलाईन फसवण्याचे प्रकार या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ़या प्रमाणात अनुभवायला मिळाले. विवाहविषयक संकेतस्थळे, फेसबुकवरील प्रोफाईलचा वापर करीत अशाप्रकारची फसवणूक केली जाते. सध्या ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटस्अँपची गोपनीयता विश्वासार्ह नसल्याचेच समोर आले आहे.
देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती, पत्रकार आणि सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या खासगी संवादावर देखभाल करीत त्यांचा डेटा सरकारला आणि परदेशी कंपन्यांना विकल्याचा आरोप व्हॉटस्अँपवर करण्यात आला आहे. गत काही वर्षापासून वापरकर्त्यांची खासगी माहिती या ना त्या माध्यमातून विकली जात असून त्याचा गैरवापर केला जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. आपण आभासी जगात जे काही करतो, ते पाहणारे डोळे छुप्या कॅमेराच्या रूपात आपल्या आसपास कुठे ना कुठे तरी असतातच याचे भान आता प्रत्येक वापरकर्त्यांनेच ठेवायला हवे. केंद्र सरकार, सुरक्षा यंत्रणा, फेसबुक, व्हॉटस्अँप, ट्विटर, इन्स्टाग्राम याशिवाय अन्य सोशल मीडिया सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनीही आता फेक न्यूज, अफवा याबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. सायबर क्राईमची व्यापकता पाहता हा विषय फक्त एखादा संदेश, कमेंट्स पास करणे, मालवेअर व्हायरस पसरविणे, माहिती चोरणे असा मर्यादित नाही, तर अनेकदा आपल्याला आलेला एखादा व्हीडिओ, मेसेज आपल्यालाही अडचणीत आणू शकतो.
न्यायालयाच्या सतर्कतेमुळे आता सायबर क्राईमविरोधातले कायदे एकीकडे सक्षम होत आहेत, तर दुसरीकडे तुम्ही ऑनलाईन झाल्यापासून ऑफलाईन होईपर्यंत काय काय करता, कोणत्या साईटस्ला भेट देता, कोणाला फॉलो करता, कोणाशी चॅट करता, या प्रत्येक अँक्शनवर अनेक हॅकर्सचा जागता पहारा असतो. सायबर क्राईम सर्व्हेक्षणाच्या आकडेवारीनुसार देशभरात घडणाऱ्या सायबर क्राईमपैकी ७० टक्के गुन्हे हे मोबाईलच्या माध्यमातूनच केले जातात. त्यात आथिर्क फसवणूक, हॅकिंग, फेक कॉल्स, बदनामी, व्हॉटस्अँप, फेसबुकच्या माध्यमातून अश्लील मेसेज, फोटो, व्हीडिओ शेअर करणे, फोटोशॉपच्या ट्रीक्स वापरून एखाद्याचे फेक अकाऊंट तयार करणे आदी सर्व प्रकारांचा समावेश आहे. खासगी संदेश सार्वजनिक करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग करणे, पैशाची, शरीरसुखाची मागणी करणे, गोपनीय माहिती चोरणे असे गुन्हे घडतात.
आपला आपल्या कुटुंबीयांशी, मित्र-मैत्रिणींशी मनमोकळा संवाद असणे याकरिताच महत्त्वाचे असते. एखादी गोष्ट, आपल्याकडून कळत-नकळत झालेली चूक आपण थेट पालकांशी बोलू शकत नाही, पण मित्र-मैत्रीण, भाऊ-बहिणीसोबत शेअर करू शकतो. या संवादामुळे कदाचित पुढचे अनर्थ टाळता येतात. भारतात डिजिटलायझेशनचा वेग २०१४ पासून इतक्या प्रचंड गतीने वाढला आहे की, या वेगाच्या आवेगात समाजस्वास्थ्याची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. देशभरात घडणाऱ्या गुन्हेगारीवर नजर टाकली असता सहज लक्षात येते की, गुन्हेगारांचे वय कमी होते आहे, तर गुन्ह्याची तीव्रता, क्रूरता आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकतम वापर तपास यंत्रणेच्या आवाक्याबाहेरचा होत चालला आहे. यातच आता सायबर क्राईमची मोठ़या संख्येने भर पडली आहे.
महाराष्ट्र पोलिसांकडे अजूनही सायबर क्राईम ब्रँच तितक्या सक्षमतेने अपग्रेड झालेली नाही. जिल्हास्तरावरील सायबर यंत्रणा पुरेशी प्रशिक्षित नाही. महत्त्वाचा भाग म्हणजे सायबर क्राईम अर्थातच मोबाईल, ईमेल, फेसबुक, व्हॉटस्अँप या आणि इतर डिजिटल सिस्टीमच्या संदर्भात इंटरनेटद्वारा एखादा गुन्हा घडला असता अशा गुन्ह्याची तक्रार नेमकी कोणाकडे करायची याबाबतचे पुरेसे ज्ञान, प्रसार अद्याप जिल्हा पातळीपर्यंत पोहोचलेला नाही. गावपातळीवर अशा सायबर क्राईम जनजागृती सेलची उभारणी होण्याची नितांत आवश्यकता आहे.