मुंबई : शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. शिधावाटप यंत्रणेत प्रधान कार्यालयासह 5 परिमंडळ कार्यालये कार्यरत असून 19 लाख 69 हजार 581 शिधापत्रिका संगणकीकृत झालेल्या आहेत. त्यापैकी 18 लाख 68 हजार 724 शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाले आहे. यंत्रणेतील 4 हजार 269 अधिकृत शिधावाटप दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आले असून या मशीनद्वारेच शिधापत्रिकाधारकांना वितरण केले जाते.
ऑफलाइन पद्धतीने अन्नधान्याचे वितरण होत नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या होत असून प्रत्येक शिधापत्रिकाधारकाची बायोमेट्रिक ओळख पटवून वितरण होत आहे. यामुळे मागील एक वर्षात 450 कोटी रूपयांच्या अन्नधान्याची बचत झाली आहे. सप्टेंबर 2019 पासून मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र केरोसिन मुक्त झाले आहे.
पाच परिमंडळांचे मंजूर नियतन सप्टेंबर 2019 मध्ये 31 हजार 540, आक्टोबरमध्ये 36 हजार 65, भारतीय खाद्य निगममधून सप्टेंबर मध्ये 31 हजार 540, ऑक्टोबरमध्ये 36 हजार 65 साठा उचल केला आहे. सप्टेंबर मध्ये 32 हजार 965 तर ऑक्टोबर 2019 मध्ये 32 हजार 640 अधिकृत शिधावाटप दुकानांमधून ऑनलाइन विक्री झाली आहे
बायोमेट्रिक नोंद आवश्यक
शिधापत्रिकाधारक यांनी अधिकृत शिधावाटप दुकानात हजर राहून बायोमेट्रीक नोंद करणे आवश्यक आहे. अशी नोंद करीत नाही तो पर्यंत त्यांना अन्नधान्याचे वाटप केले जात नाही. कोणत्या लाभार्थ्याने कोणत्या महिन्यात किती अन्नधान्याची उचल केली याबाबत पूर्ण माहिती mahaepos.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.