Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘पु.ल. कला महोत्सव २०१९’चा समारोप

मुंबई : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित पु.ल. कला महोत्सव २०१९ चा समारोप रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

समारोप समारंभाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अकादमीचे सल्लागार मिलिंद लेले, सतीश जकातदार, नारायण जाधव, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे उपस्थित होते.

समारोप कार्यक्रमात अकादमीच्या ‘महाकला’ या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक घटकांचे संवर्धन होण्यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे .

यावेळी अकादमीच्या पुलं कट्टा या उपक्रमात सहभागी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच अकादमीतर्फे पत्र लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सनविवि’ या उपक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांना पोस्टकार्ड देऊन पत्रलेखनास प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रास्ताविक श्री. चवरे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत प्रभादेवी ( मुंबई ) येथील रवींद्र नाट्यमंदिरात दि. ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ‘पु. ल. कला महोत्सव २०१९’ दरम्यान विविध कला आविष्कारांवर आधारित दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

Exit mobile version