डॉ.उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रपती भवनात प्रथमच देशातील ज्येष्ठ व नामवंत आणि तरूण चित्रकारांचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या चित्रकारांच्या कलाकृती कायमस्वरूपी राष्ट्रपती भवनात लावण्यात येणार आहेत. असा उपक्रम राबविण्याचा मान डॉ. पाचारणेंना मिळाला असून त्यांच्या रूपाने मराठीची चित्रमुद्राच राष्ट्रपती भवनात उमटली आहे.
राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पाचारणे यांनी अकादमीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. राष्ट्रपती भवनात बहुतांश परदेशी चित्रकारांचीच चित्रे असल्याचे निदर्शनास आल्यावर या भव्य वास्तूत देशातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांचाही समावेश व्हावा या चिंतनातून डॉ. पाचारणे यांनी अकादमीच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस केला. त्याचीच फलश्रुती म्हणजे देशातील ज्येष्ठ व नामवंत चित्रकार आणि तरूण चित्रकारांच्या निवासी शिबिराचे या वास्तुतील आयोजन होय.
10 ते 17 नोव्हेंबर 2019 या कालावधीत आयोजित या शिबिरामध्ये देशातील ज्येष्ठ व नामवंत 12 चित्रकार आणि 3 तरूण चित्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक कलाकार हा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध असून त्यांच्या दीर्घ साधनेतून राष्ट्रपती भवनाच्या वास्तूत श्रेष्ठ कलाकृती आकाराला येत आहेत. प्रत्येक चित्रकार या शिबिरादरम्यान आपल्या दोन कलाकृती तयार करीत आहे.
महाराष्ट्रातील तीन चित्रकारांचा समावेश
राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या माध्यमातून प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले आहे. हा एक ऐतिहासिक प्रसंग असून महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ आणि दोन तरुण असे तीन चित्रकार या शिबिरात सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती भवनातील निसर्गरम्य वातावरणात चित्र काढण्याचा वेगळाच आनंद असल्याचे मुबंई येथील ज्येष्ठ व नामवंत चित्रकार सुहास बहुलकर यांनी सांगितले. चित्रकारांच्या पहिल्यावहिल्या निवासी शिबिरात सहभागी होणे हा बहुमान असल्याचेही ते म्हणाले. श्री. बहुलकर यांनी भिंतीवरील चित्रशैली आणि त्यात पोतांचा लीलया वापर करून या ठिकाणी दोन कलाकृती साकारल्या आहेत. त्यात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, वाडे, पूर्वज आणि त्याच्यावर उमटलेल्या नियतीच्या पाऊलखुणा या सगळयांची वर्तमानासोबत सांगड घातली आहे.
तुळजापूर येथील सिद्धार्थ शिंगाडे आणि अहमदनगर येथील प्रणिता बोरा हे तरूण चित्रकारही या ऐतिहासिक शिबिरात सहभागी झाले आहेत. सिद्धार्थ शिंगाडे यांनी साकारलेल्या पहिल्या कलाकृतीत भगवान शंकर आणि त्यांचे वाहन आराम करीत असल्याचे दर्शविले असून यात निळया रंगाची उत्तम छटा दाखवत निसर्गरम्य पहाटेचे सौंदर्यही खुलविले आहे. श्री. शिंगाडे यांच्या दुसऱ्या कलाकृतीत त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र रेखाटले आहे ज्यात खेळणी विकणारे दांपत्य, गायी चरायला नेणारा मुलगा, मंदिर, स्त्री आदी प्रतिमा साकारल्या आहेत. प्रणिता बोरा यांनी उत्तम रंगसंगतीचा उपयोग करून राधा-कृष्ण आणि मीरा यांच्या विविध प्रतिमा कौशल्यपूर्ण पद्धतीने आपल्या कलाकृतीत मांडल्या आहेत.
राष्ट्रपती कोविंद साधणार चित्रकारांशी संवाद
राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे 17 नोव्हेंबर रोजी स्वत: या निवासी शिबिराचे अवलोकन करणार असून सहभागी चित्रकारांसोबत संवाद साधणार आहेत. या शिबिरादरम्यान चित्रकारांनी चितारलेल्या कलाकृती कायमस्वरूपी राष्ट्रपती भवनात प्रदर्शित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनाची शोभा या कलाकृतींच्या माध्यमातून वाढणार आहे. राष्ट्रपती भवनास भेट देणारे देश-विदेशातील विशेष अतिथी तसेच सामान्य जनतेलाही या कलाकृती बघायला मिळणार आहेत.
शिबिरात सहभागी कलाकारांमध्ये अंजली इला मेनन, अन्वर खान, अर्पिता सिंग, चंद्रा भट्टाचार्यजी, चिन्मय रॉय, गणेश हालोई, क्रिशेन खन्ना,लालुप्रसाद शॉ, परमजित सिंग, सनत कर, संजय भट्टाचार्य आणि सुहास बहुलकर या ज्येष्ठ व नामवंत चित्रकारांसह विम्मी इंद्रा , प्रणिता बोरा आणि सिध्दार्थ शिंगाडे या तरूण चित्रकारांचा समावेश आहे.