Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : पश्चिम विभागात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला केंद्रीय रसायने व खतेमंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते देशातील पश्चिम विभागातील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल  व स्वच्छता विभागाच्या वतीने जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2019’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारीया, पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यावेळी मंचावर उपस्थित होते.

उत्कृष्ट कार्याकरिता यावेळी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. पश्चिम विभागामधून महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव तथा स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचे  प्रकल्प संचालक अभय महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पुरस्काराविषयी माहिती देताना स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचे राज्य समन्वयक गणेश वाडेकर यांनी सांगितले, स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत घालून दिलेल्या विविध घटकांच्या उत्तम अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात मुख्यत्वे राज्यातील 34 जिल्ह्यांतील निवडक एकूण 800 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम राबविणे, ऑनलाईन डाटा तयार करणे, सार्वजनिक स्थळांची केंद्र शासनाच्या पथकांकडून झालेल्या तपासणीत उत्तम कामगिरी, थर्ड पार्टी निरीक्षण यांसह प्रत्यक्ष जनतेसोबत व ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद आणि मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षणामध्ये उत्तम कामगिरीची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आल्याचे श्री. वाडेकर यांनी सांगितले.

Exit mobile version