Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट हटवून भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याविषयी राज्यपालांनी सादर केलेली शिफारस पत्रं केंद्र सरकारनं न्यायालयासमोर सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात देवेंद्र फडनवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं  सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला नोटिस जारी केली आहे. न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या पीठानं देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांना देखील नोटिस जारी केली आहे. तसंच सत्तास्थापनेसाठी भाजपानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जे दस्तावेज सादर केले ते सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिले.

या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. आज या तिन्ही पक्षांच्या आणि केंद्र सरकारच्या वकिलांनी आपापले युक्तिवाद केले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यांनी महाराष्ट्रात आजच बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली. तर केंद्र सरकारच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.

विरोधकांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाऐवजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करायला हवी होती, असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. या तीन पक्षांना आघाडी सरकार बनवण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यामुळे त्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याची अनुमती देता येणार नाही, असं मेहता म्हणाले.

Exit mobile version