मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं राज्यापालांकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा केला आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या तीनही पक्षांच्या विधीमंडळ गटनेत्यांच्या स्वाक्षरीचं संयुक्त पत्र आज, तिनही पक्षाच्या शिष्टमंडळानं राज्यपाल कार्यालयाला सादर केलं. तीनही पक्षांचे विधीमंडळ गटनेते, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे यावेळी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांनी शपथ घेतली असली, तरीही त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही, अशावेळी भाजपा आणि अजित पवार बहुमत सिद्ध करायला असमर्थ ठरतील, आणि तसं झालं तर शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करत आहे, त्यामुळे फडणवीस बहुमत सिद्ध करायला अपयशी ठरल्यानंतर आम्हाला सत्ता स्थापनेसाठी तात्काळ आमंत्रण द्यावं असं या पत्रात म्हटलं आहे. या पत्रासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस तसंच पाठिंबा असलेल्या इतर सहयोगी आणि अपक्ष विधानसभेच्या सदस्यांची स्वाक्षरी असलेली यादीही या पत्रासोबत राज्यपाल कार्यालयाला सादर केली आहे.
राज्यपाल मुंबईत नसल्यानं आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांना आज आपण घेऊन आलो नाही, मात्र राज्यपालांनी कधीही बोलावल्यास आपण या आमदारांना राज्यपालांसमोर घेऊन येऊ, असं जयंत पाटील यांनी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिल्यानंतर वार्ताहरांना सांगितलं. एकीकडे शिवसेनेला वेळ वाढवून द्यायला नकार देणाऱ्या राज्यपालांनी, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणं म्हणजे लोकशाहीची पायमल्ली असल्याचा आरोप शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला.