नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्या दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं आहे. आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी, महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी झालेल्या घडामोडींमधल्या राज्यपालांच्या भूमिकेविरोधात हौद्यात येऊन, रालोआ सरकारविरोधात फलक दर्शवत घोषणा द्यायला सुरुवात केली.
महाराष्ट्रातली सत्तास्थापनेची प्रक्रिया म्हणजे लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याचं मत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गोंधळातच मांडलं. यादरम्यानही गोंधळ न थांबल्यामुळे अखेर बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकुब केलं. १२ वाजता कामकाज पुन्हा सुरु झाल्यावरही गोंधळाचं वातावरण कायम राहील्यानं पुन्हा दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही काँग्रेसच्या सदस्यांसह, डाव्या आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकैय्या नायडू, सभागृहात न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा घेतली जाऊ शकत नाही असं म्हणत, हा प्रस्ताव फेटाळला. यादरम्यान गोंधळ सुरुच राहील्यानं अखेरीस नायडू यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकुब केलं.