नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ते नवी दिल्लीत एका खासगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज बोलत होते.
महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेच्या निवडणूकपूर्व युतीला सरकार स्थापन करण्यासाठी जनतेनं स्पष्टं बहुमत दिलं होतं, मात्र कुठल्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नीतिमत्ता आणि सदाचार गुंडाळून ठेवण्यात आला असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेचा पाठिंबा मिळवणं हा घोडेबाजार नाही काय असा प्रश्न करून ते म्हणाले की भाजपानं हा घोडेबाजार टाळला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीनं मात्र घोड्यांची संपूर्ण पागाच मुख्यमंत्रीपदासह चोरली आहे असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा करून नंतर शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा असं आवाहनही अमित शहा यांनी यावेळी केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला आधी पाठिंबा देऊन नंतर राजीनामा दिल्याबद्दल आपण योग्यवेळी बोलू, अशी प्रतिक्रिया काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज विधान भवनात पत्रकारांशी बोलत होते.