पुणे : देशातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार असून गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी आज व्यक्त केले.
जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची बैठक आज राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, उपायुक्त डॉ. बाकरेवान, डॉ. शिवाजी विधाते, डॉ. अनिल देशपांडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहायक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, समितीचे सदस्य सुरेश रास्ते, संदीप नवले, नेहा पंचामिया आदी उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीत गाईला पवित्र मानले जाते. गाईचे दूध, गोमूत्र यामध्ये औषधी गुणधर्म असतात. याशिवाय गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो. गाईच्या या सर्व गुणधर्मामुळे तिचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी गोशाळांना स्वावलंबी करण्यावर आपण भर देणे आवश्यक असल्याचे सांगतानाच आदर्श गो शाळांना पर्यंटन केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. कथिरिया यांनी सांगितले.
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गोसंवर्धनासंदर्भात प्रशिक्षण व बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगून प्रत्येक शेतक-यांकडे एक तरी गाय असावी, तसेच यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा डॉ. कथिरिया यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. कथिरिया यांनी जिल्हा प्राणी क्लेष समितीचे सदस्य व पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांकडून गोसंवर्धनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.