पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुध्दीकरणासाठी मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विविध ॲप उपलब्ध करून दिलेले असून अधिकाधिक मतदारांनी या ॲपचा उपयोग करुन घेतल्यास मतदार यादीमधील माहिती अद्ययावत होवून मतदार यादीत सुसुत्रता येईल, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली, यावेळी श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, भारत निवडणूक आयोगाचे तांत्रिक प्रशिक्षक उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यात सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. निवडणूक काळात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या वतीने गौरविण्यात येणार असून यासाठी सर्व जिल्ह्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावेत. निवडणुकीचे कामकाज अधिक सुलभ होण्यासाठी तसेच मतदार याद्या शुध्दीकरणासाठी विविध ॲप सुरु करण्यात आले आहेत. या ॲपची सविस्तर माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, सध्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदार पडताळणी कार्यक्रम ॲप चा वापर केल्यास मतदार याद्यांमधील चुका सुलभपणे दुरुस्त करता येतील. सर्व उप जिल्हा निवडणूक अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांनी प्रशिक्षणात सविस्तर माहिती घेवून अॅप चा प्रभावीपणे वापर करावा.
भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुध्दीकरणासाठी तसेच मतदारांनी स्वत:ची माहिती अद्ययावत करून घेण्यासाठी विविध अॅप उपलब्ध करून दिले आहेत. यामधील वोटर हेल्पलाईन ॲप मध्ये इलेक्टोरल व्हेरिफिकेशन प्रोग्राम (ई व्ही पी) म्हणजेच मतदार पडताळणी कार्यक्रम आहे. या ॲपद्वारे स्वत:ची माहिती मतदार अद्ययावत करू शकतील. नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल (एन व्ही एस पी) या मोबाईल ॲपमध्ये देखील मतदार पडताळणी कार्यक्रमाची (ई व्ही पी) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच मतदार नोंदणी अधिकारी हे बीएलओ ईव्हीपी ॲप द्वारे घरोघरी भेटी देवून मतदारांची माहिती अद्ययावत करतील. या ॲपद्वारे मतदार दुबार नावे स्वत: कमी करू शकतील. तसेच मतदार यादीत नाव, फोटो, पत्त्याबाबतची वैयक्तिक माहिती चुकीची नोंद झाली असल्यास त्यातही मतदारांना दुरुस्ती करता येईल. कुटुंबातील सर्व सदस्यांची एकाच मतदान केंद्रावर नाव घेण्यासाठीची विनंती देखील ॲपद्वारे नोंदविता येणार आहे. हे सर्व कामकाज ERO Net प्रणालीमध्ये करण्याबाबतची माहिती राज्यस्तरीय प्रशिक्षणात देण्यात आली.
या प्रशिक्षणास राज्यातील सर्व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, तांत्रिक अधिकारी तसेच पुणे जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.