Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आरे मेट्रो कारशेडच्या कामाला राज्य सरकारनं दिली स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : आरे मेट्रो कारशेडच्या कामाला राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. कारशेड संबंधात पुर्नआढावा घेतला जाईल. तोपर्यंत आरेमधलं एक पानही तोडलं जाणार नाही; स्थगिती आरेमधल्या कामाला आहे, मेट्रोच्या विकासकामांना नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ते मंत्रालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते.

राज्य सरकार, आपल्या सगळ्यांचं आहे, जनतेच्या एका पैशाचीही उधळपट्टी होऊ देणार नाही. जनतेबरोबर नम्रपणेच वागायला हवं असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शेतक-यांना दिलेला शब्द पाळणारच, त्या दिशेनं काम सुरु केलं आहे. सचिवांना यासंदर्भातला वास्तववादी अहवाल सादर करायला सांगितलं आहे. तो आला की त्यानुसार पावलं उचलू असं ते म्हणाले.

प्रशासकीय काम समजून घेतोय, रुळायला थोडा वेळ लागेल, जनतेची कामं मार्गी लावण्यासाठी, तसंच पारदर्शक कारभार देण्यासाठी प्रयत्नरत राहू असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, 70 टक्के काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणं, हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत नुकसानकारक आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईकरांच्या प्रश्नावर असं राजकारण चांगलं नाही, असा टोला त्यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.

Exit mobile version