Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी लोकसभेत मागितली माफी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत माफी मागितली.
प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला होता. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर, प्रज्ञा सिंह ठाकूर आज याबाबत पुन्हा लोकसभेत निवेदन करतील असं सांगितलं.
त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी विशेष संरक्षण समूह विधेयकाच्या चर्चेदरम्यान निवेदन सादर करत आपण नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र आपल्या  वक्तव्यामुळे  कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर सदनाची माफी मागत असल्याचं प्रज्ञा  सिंह यांनी सांगितलं.
त्यापूर्वी आज लोकसभेत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर प्रज्ञा सिंह यांनी माफी मागायची तयारी दर्शवली तरीही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला.
या गदारोळात संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी भाजपाच्या सर्व खासदारांनी पदयात्रा काढावी असे निर्देश प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं. मात्र गदारोळ कायम राहिल्यानं सभापतींनी कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं.
Exit mobile version