Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या – सचिवांच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, जनतेने दिलेल्या करातून विकासकामांसाठी निधी प्राप्त होत असतो. निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. ‘सरकार माझे आहे’ अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

जनतेने विश्वासाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. विकासकामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही वाढेल याकडेदेखील लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा.

जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. शासन आणि प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात आपुलकीची आणि आदराची भावना निर्माण होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांगीण विकास साधताना कामांची गती आणि दिशेलाही तेवढेच महत्त्व आहे. त्यादृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. अधिकारी आपल्या जबाबदारीचे सक्षमपणे निर्वहन करतील आणि प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version