मुख्यमंत्र्यांनी केली किल्ले रायगड जतन संवर्धन कामांची पाहणी
किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे काम योग्य पद्धतीने सुरु आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडाच्या जतन संवर्धनाच्या कामाबद्दल आज येथे समाधान व्यक्त केले. यानिमित्ताने सर्व शिवप्रेमींची मागणी पूर्ण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
किल्ले रायगड विकासासाठी शासनाने 606 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 59 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. यासंदर्भात किल्ले रायगड येथे आज मुख्यमंत्री श्री.फडणवीस हे जतन संवर्धन कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत किल्ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, रघुजीराजे आंग्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी,जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, भारतीय पुरातत्व विभागाचे मुंबई विभागाचे निर्देशक बिपिनचंद्र नेगी, रायगड किल्ल्याचे प्रभारी जंगले, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आदी उपस्थित होते.
आपल्या संबोधनात श्री. फडणवीस म्हणाले की, रायगड किल्ल्यावरील पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन हे इतिहासाशी निगडीत केले जात आहे. शिवाय किल्ले परिसरात पर्यटकांना येण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, किल्ल्याकडे येणारे रस्ते रुंदीकरण करणे, त्यासाठी जमीन संपादन प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यासाठी लोकांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री.फडणवीस यांनी पाचाड येथे राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते रोप-वे ने किल्ल्यावर दाखल झाले. रोप वे अप्पर स्टेशन पाथवे येथून कुशावर्त तलाव, वाघ दरवाजाकडे जाणाऱ्या या मार्गाच्या पुनरुज्जीवनाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर ते होळीचा माळमार्गे बाजारपेठ पाहून जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तेथे त्यांनी जगदीश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथून ते पुन्हा बाजारपेठ, होळीचा माळमार्गे हत्ती तलाव येथे आले. तेथील कामांचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर शिर्काई देवीचे दर्शन घेऊन ते हत्तीखान्यात आले. येथे रायगड विकास प्राधिकरणाच्या आतापर्यंत झालेल्या कामांचे व्हीडिओ चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी माहिती देण्यात आली की रायगडावरील पाणीसाठ्याच्या उपलब्धतेसाठी गडावरील 22 तलावांमधील गाळ काढणे व गळती दुरुस्त करण्याचे काम करण्यात आल्याने गडावर मुबलक पाण्याची उपलब्धता आहे.
त्यानंतर श्री. फडणवीस हे होळीचा माळ मार्गे नगारखाना व तेथून राजसदरेवर आले. राजसदरेवर सिंहासनावरील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बालेकिल्ला, राणीवसा पाहून ते मेणा दरवाजामार्गे खाली उतरले.