विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोध हा शब्दच मला मान्य नाही. त्यामुळे यापुढील काळात विरोध हा शब्द बाजूला काढून सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया.
विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेतेपदी श्री. फडणवीस यांची निवड करण्यात येत असल्याचे घोषीत केले. सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह उपस्थित मंत्री आणि सदस्यांनी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.
निवडीनंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदी निवडीबद्दल मी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करतो. श्री. फडणवीस हे मागील अनेक वर्षांपासून माझे मित्र आहेत. आता मी सत्तेत आणि ते विरोधात असले तरी मैत्रीत फरक पडणार नाही.
विधानसभेत निवडून आलेल्या सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व सदस्यांचे ‘जनहित’ हेच एकमेव उद्दिष्ट असते. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटातील सदस्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे, सर्वांना न्याय द्यायचा आहे. त्यामुळे विरोध आहे कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापुढील काळात विरोध हा शब्द बाजूला काढून सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया, असेही श्री. ठाकरे पुढे म्हणाले.
मला राज्यातील शेतकऱ्याला फक्त कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करायचे आहे. याकामी विरोधी पक्षाचीही मदत लागेल. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे केवळ विरुद्धार्थी शब्द न राहता सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी कार्य करु. याकामी विरोधी पक्षनेत्यांची निश्चितच साथ लाभेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.
सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, श्री. फडणवीस हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांना 2003 मध्ये विधीमंडळाचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला आहे. चांगल्या व्यक्तिमत्वाला विरोधी पक्षनेता म्हणून विराजमान होण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. जनतेसाठी काम करण्याची तळमळ ही विरोधी पक्षनेत्याकडे असते. ही परंपरा श्री. फडणवीस पुढील काळात चालवतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन- देवेंद्र फडणवीस
अभिनंदनच्या प्रस्तावाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो. श्री. ठाकरे यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत. मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी ज्या योजना आखतील, जे काही निर्णय घेतील, त्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून नेहमीच सहकार्य करू. सभागृहात नेहमीच नियम व संविधानानुसार कामकाज केले जाईल. जनतेच्या हक्कासाठी सर्व संसदीय आयुधाचा वापर केला जाईल. विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांची फार मोठी परंपरा आहे. या पदावरील प्रत्येक नेत्याने आपापल्या परीने समाजासाठी प्रश्न मांडण्याचे काम केले आहे. या पदाची उंची आणखी वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर मंत्री सर्वश्री. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री चंद्रकांत पाटील, किशोर जोरगेवार, आशिष शेलार, रवींद्र वायकर, धनंजय मुंडे, बच्चू कडू, हितेंद्र ठाकूर आदींची भाषणे झाली. सर्वांनी निवडीबद्दल श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले.