नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएमसी बँकेतले 78 टक्के खातेधारक आपल्या खात्यातली रक्कम काढून घेऊ शकतात असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. त्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. रक्कम काढण्यासाठीच्या कमाल मर्यादेवर काटेकोर लक्ष असून खातेदारांच्या हितासाठी पुढची पावलं उचलली जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रवर्तकांची टाच आलेली मालमत्ता ठरावीक शर्तींवर रिझर्व्ह बँकेला देता येऊ शकते. या मालमत्तेचा लिलाव करुन खातेदारांचे पैसे देता येतील, असं त्या म्हणाल्या. अडीअडचणीसाठी एक लाख रुपये काढता येतील. वैद्यकीय कारण नसेल तर मात्र 50 हजार रुपये खात्यातून काढता येणार आहेत.
बँकेशी निगडित तक्रारींबद्दल राज्य पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरु केल्याची माहितीही सीतारामन यांनी दिली.