पुणे : पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरणाकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून प्रत्येकी हेक्टरी 15 लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी पुणे महापालिकेने जिल्हाधिका-यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेच्या धनादेशाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन ) भारत वाघमारे व तहसिलदार (पुनर्वसन) स्मिता पवार, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
पुनर्वसनाचा खर्च पुणे महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. राज्यातील हे एकमेव उदाहरण आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणासाठी ज्या शेतक-यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत त्यांच्या जमिनीचा शासनाने निर्धारीत केलेल्या दराप्रमाणे मोबदल्याच्या रकमेच्या धनादेशाचे वाटप आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. शासनाने राज्यात पहिल्यांदाच हा निर्णय घेवनू एकाच वेळी 914 प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला आहे. याबद्दल यावेळी उपस्थित शेतक-यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.