कोल्हापूर : पोलीस प्रशासनात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदली लाच घेताना यापुढे पकडला जाईल त्याला निलंबित करण्याऐवजी थेट नोकरीतून काढून टाकले जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराची कीड कमी होणार आहे. सध्या कोल्हापूर पोलीस दलामध्ये वर्षभरात २० पोलीस निलंबित आहेत.
मुंबई पोलीस दलामध्ये भ्रष्टाचार वाढल्याने पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायस्वाल यांनी लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित नाही तर थेट नोकरीवरून काढून टाकण्याचे आदेश काढले आहेत. हा निर्णय पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यापुढे हा आदेश लागू होणार असल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत.
महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आर.टी.ओ., नगर भूमापन, बँका, रजिस्टेशन, आदी प्रशासकीय कार्यालयांत कामाच्या बदली लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये पोलीस दल ‘नंबर वन’ आहे. त्यामुळे ‘खा’की अशी ओळख पोलीस खात्याची झाली आहे. पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतील आरोपीसह फिर्यादीकडून तपास अधिकारी किंवा कर्मचारी वरकमाई मिळविण्याचा प्रयत्न करतात. पैशांच्या भुकेने पछाडलेला काही वर्ग आजही पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. लाच स्वीकारल्यानंतर अटक होऊन दोन दिवसांनी अहवाल मिळाल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाते. पुन्हा सहा महिन्यांनंतर ते पोलीस खात्यात नियमित रूजू होतात.
पोलीस दलामध्ये लाच घेणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पोलीस दलाची पुर्णता नाचक्की होते. एकीकडे सरकार स्वच्छ आणि इमानदार प्रतिमा असल्याचा दावा करत आहे; परंतु दुसरीकडे पोलीस दलामध्ये भ्रष्टाचार वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने सरकारचा दावा खोटा ठरत आहे. यापुढे लाच घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना थेट ‘घरचा रस्ता’ दाखविला जाणार आहे. त्यासाठी पोलीस दलातील बहुतांशी अधिकारी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.