नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं शस्त्र दुरुस्ती विधेयक २०१९ ला मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे शस्त्र कायदा १९५९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नव्या विधेयकामुळे एका व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवान्यामध्ये घट करण्यात आली आहे. नव्या विधेयकानुसार प्रत्येक व्यक्तीला दोन शस्त्र परवाने मिळू शकतील, अशी माहिती गृह राज्यमंत्री जी. शंकर रेड्डी यांनी यावेळी दिली.
नव्या कायद्याचं पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडाच्या रकमेत वाढ सुचवण्यात आली आहे. तसंच या परवान्याची वैधता तीन वर्षांवरून पाच वर्ष करण्यात आली आहे. अवैधरित्या शास्त्रांची निर्मिती आणि तस्करी हा फार चिंतेचा विषय आहे, असं चर्चेला उत्तर देताना रेड्डी यांनी सांगितलं. त्याला प्रतिबंध घालणं गरजेचं असून, हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. नव्या दुरुस्ती विधेयकामुळे या गैरप्रकाराला चाप बसेल, असं ते म्हणाले.
नव्या विधेयकामुळे बंदुकीच्या प्रत्येक गोळीवर अनुक्रमांक असणार आहे. त्यामुळे तिच्या वापरा संदर्भात त्वरित माहिती मिळेल. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत करण्यात प्रशासनाला यश आलं आहे.