नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज रिसॅट टू बीआरवन या निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. पीएसएलव्ही- सी ४८ या प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरच्या पहिल्या प्रक्षेपण तळावरून आज दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे.
या प्रक्षेपणाची उलट गणना काल संध्याकाळी चार वाजून ४० मिनिटांनी सुरू झाली. रिसॅट टू बीआरवन हा रडार इमेजिंग उपग्रह असून, ६२८ किलोग्रॅम वजनाच्या या उपग्रहाला ५७८ किलोमीटरवरच्या कक्षेत ३७ अंशाच्या कोनात ठेवलं जाणार आहे.
पीएसएलव्हीची ही पन्नासावी मोहीम असून, रिसॅट या उपग्रहासोबतच पीएसएलव्ही- सी ४८ हा प्रक्षेपक इस्राएल, इटली, जपान आणि अमेरिकेच्या ९ उपग्रहांचं देखील प्रक्षेपण करणार आहे. न्यूस्पेस इंडियाशी झालेल्या व्यापारी करारांतर्गत या इतर उपग्रहांचं प्रक्षेपण होणार आहे.