Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागरिकांचे प्रश्न गतीने मार्गी लावून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा ; जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड

पुणे : जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्यांनी उपस्थित केलेले नागरिकांचे प्रश्न गतीने मार्गी लावून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित विभागांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करावा, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव भानुदास गायकवाड यांनी केल्या.

जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची सभा श्री. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, यावेळी ते बोलत होते. या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रंजना उबर हांडे, नायब तहसीलदार सुरेश मुंढे, अशासकीय सदस्य बाळासाहेब औटी, तुषार झेंडे तसेच अन्य अशासकीय व शासकीय सदस्य उपस्थित होते.

श्री गायकवाड म्हणाले, नागरिकांना भेडसावणारे प्रश्न समिती सदस्य बैठकीत मांडत असतात. संबंधित विभागांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन  ते लवकरात लवकर निकाली काढावेत, यामुळे नागरिकांची गैरसोय टाळता येईल. बैठकीला वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी कार्यवाहीच्या परिपूर्ण अहवालासह उपस्थित राहावे म्हणजे कामाच्या सद्यस्थितीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही श्री गायकवाड म्हणाले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी निवासस्थान वेळेत दुरुस्त केल्याबद्दल तसेच मागणी केलेल्या ठिकाणी एस टी बस थांबे केल्याबद्दल समिती सदस्य देवेंद्र जगताप, बाळासाहेब औटी, तुषार झेंडे यांनी समाधान व्यक्त केले.

शासकीय कार्यालयांमध्ये दुपारच्या भोजनाची वेळ निश्चित ठेवून या वेळेचा फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना शासकीय कार्यालयांना द्याव्यात, जेणेकरून शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी सदस्यांनी केली. नागरिकांना आरोग्य सुविधा व अँम्ब्युलन्स तात्काळ उपलब्ध व्हावी, धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य सुविधांचे फलक लावण्यात यावेत, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालयात नैसर्गिक व सिझेरियन प्रसूतीची आकडेवारी दर्शविणारा फलक दर्शनी भागात लावला जावा, आठवडी बाजार व बचत गटातील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबण्यासाठी पणन विभागाने उचित कार्यवाही करावी, शेतीपंपाची विजेची बिले शेतकऱ्यांना वेळेत दिली जावीत,  ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे आणि खचलेल्या रस्त्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर करावी, आवश्यक ठिकाणी एसटी बस थांबे करावेत, अशा विविध मागण्या अशासकीय सदस्य यांनी बैठकीत केल्या. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version