मुंबई : ‘तंबाखू नव्हे, जीवन निवडा’, समाजाला तंबाखूच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी केवळ कायदा नव्हे तर जनजागृती आणि समाजाकडून सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे डॉ. उल्हास वाघ यांनी आज सांगितले. 31 मे या जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिनानिमित्त मुंबईतल्या पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम’ या विषयावर ते बोलत होते.
जागतिक आरोग्य संघटनेने दशकभरापूर्वी तंबाखू नियंत्रणासाठी ‘एमपॉवर’ कार्यक्रमाचा उपयोग करायला सुरुवात केल्यापासून जागतिक तंबाखू नियंत्रणाबाबत लक्षणीय प्रगती झाल्याचे ते म्हणाले.
तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे भयावह चित्र स्पष्ट करतानाच भारतात तंबाखूमुळे दर आठ सेकंदाला एकाचा मृत्यू होतो. दर दिवशी पाच हजार मुलं तंबाखूच्या विळख्यात येतात अशी माहिती त्यांनी दिली. किशोरवयीन मुलींनाही सिगारेटचे व्यसन लागत असल्याचे ते म्हणाले. तणाव, कठोर परिश्रमानंतर थकवा दूर करण्यासाठी, चित्रपटांमधल्या प्रसिद्ध व्यक्तीरेखांचे अनुकरण करण्यासाठी तर कुतूहल म्हणूनही तंबाखूचे सेवन केले जाते. 14 टक्क्यांपेक्षा जास्त मुलं वेगवेगळ्या स्वरुपात तंबाखूचे सेवन करतात तर 34 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची जाणीवही नसते. तंबाखूमध्ये निकोटीन, अमोनिया, मिथेनॉल, कार्बन मोनोक्साईड यासारखी 4,000 घातक रसायन असल्याचे डॉ. वाघ म्हणाले.
तंबाखू सेवनामुळे अनेक प्राणघातक आजारांना निमंत्रण मिळते. यामध्ये हृदय रोग, फुफ्फुसाशी संबंधित रोग, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिन्यांमध्ये थर साचणे, मुख कर्करोग, हिरड्या, दात यांच्याशी संबंधित समस्या निर्माण होणे यांचा समावेश आहे.
सिगारेटचे व्यसन असणारा जीवन साथीदार नको अशी 10 पैकी 8 मुलींची भावना असल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणातून देण्यात आली आहे.
सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांच्या सेवनाला तसेच जाहिरात उत्पादन पुरवठा याला प्रतिबंध करणारा कायदा 2003 मध्ये संमत करण्यात आला आणि 2008 पासून हा कायदा लागू करण्यात आला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक आर.एन.मिश्रा, पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक डी. जे. नारायण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अकाऊंटन्ट जनरल ऑफिस आणि सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.