मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी आधिवेशन नागपुरात सुरु झालं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं विधानसभेत सोळा हजार एकशेवीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
पूरग्रस्त भागासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये, तर अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ७५० कोटी रुपयांच्या मागण्या त्यात केल्या आहेत. यापैकी ५२५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या नैर्सगिक आपत्ती ग्रस्तांसाठी आहेत. तर २ हजार कोटी रुपयांच्या मागण्या पिण्याचं पाणी आणि स्वच्छता योजनांसाठी आहेत. पुढच्या दोन दिवसात या पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल आणि त्यानंतर त्या मंजूर केल्या जातील.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद दोन्ही सभागृहांमधे उमटले. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव दिला, यासंदर्भात निवेदन करताना, फडनवीस यांनी सावरकरांबाबत केलेला उल्लेख कामकाजात न घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली, त्यावरून विरोधी पक्षानं जोरदार घोषणाबाजी करून निषेध दर्शवला.
या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोनवेळा स्थगित करावं लागलं. शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदतीचं आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीकाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली. विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी सुभाष देसाई, तर विरोधी पक्षनेते पदी प्रवीण दरेकर यांची नियुक्ती झाल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
भारताच्या सरन्यायाधीशपदी शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्तावही विधानपरिषदेनं आज मंजूर केला. विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी गोपीकिशन बाजोरिया , प्रकाश गजभिये, अनंत गाडगीळ, रामदास आंबटकर, श्रीकांत देशपांडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिवाजीराव दत्तात्रय पाटील यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर केला.