Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पालघर जिल्हा परिषदेसाठी ७ जानेवारीला मतदान

मुंबई : पालघर जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 18 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 22 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्‌टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 24 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसल्यास 30 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी 1 जानेवारी 2020 रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

पालघर जिल्हा परिषदेंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक होईल. त्यातील 57 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम

Exit mobile version