नागपूर :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2 हजार 100 कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या 6 हजार 600 कोटी रुपयांपैकी 2 हजार 100 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
राज्य शासनाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 7 हजार 400 कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 7 हजार 200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.