मुंबई (वृत्तसंस्था) : आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. डॉ. लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली.
अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं. आपल्या कारर्किदीत जवळपास ५० हून अधिक नाटकात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ सुगंधी कट्टा या चित्रपटातल्या अभिनयानंही त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मराठी बरोबरच घरोंदा, लावारिस. अग्निपरीक्षा, कामचोर, इन्कार, काला बाजार, किशन कन्हैय्या, गांधी, घुंगरू की आवाज यासारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलं.
लागू यांना त्यांच्या अभिनयासाठी फिल्मफेअर, कालिदास सन्मान, दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरवसह अनेक पुरस्कारही मिळाले. डॉ. लागू यांच्या निधनानंतर त्यांना चित्रपटसृष्टीसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.