Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हैदराबादमध्ये पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांचे मॉडेल राबविण्यासाठी पुढाकार

हैदराबादच्या चार उच्चस्तरीय पथकांचे सलग अभ्यास दौरे

पुणे : हैदराबाद (तेलंगणा) येथील 20 हून अधिक प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण चार पथकांनी नुकतेच पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांचे विशेष अभ्यास दौरे केले. येथील स्मार्ट सिटी प्रकल्पांचे अनुकरण व अंमलबजावणी हैदराबादमध्ये करण्यासाठी तेथील महापौरांनी पुढाकार घेतला आहे. 

हैदराबादचे महापौर डॉ. बोन्तू राममोहन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना नोव्हेंबरमध्ये भेट दिली होती. या प्रकल्पांची दखल घेत त्यांनी प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेतील (जीएचएमसी) महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पुणे स्मार्ट सिटीचा अभ्यास दौरा करण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने डिसेंबरमध्ये आतापर्यंत हैदराबाद महापालिकेतील विविध विभागांतील २० अधिकाऱ्यांची चार पथके पुणे दौर्‍यावर आली. पीएससीडीसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी शिष्टमंडळांचे स्वागत केले आणि त्यांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अभ्यास भेटी दरम्यान तपशीलवार सादरीकरणाद्वारे त्यांना उपयुक्त माहिती दिली.

अभ्यास दौऱ्यावर आलेल्या पथकांमध्ये आयएएस हरिचंदना दासरी, आयएएस मुशर्रफ फारुकी, आणि अतिरिक्त आयुक्त व्ही. कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली सहा क्षेत्रीय आयुक्त, नागरी जैव-विविधता विभागाचे संचालक व अन्य अधिकारी यांचा समावेश होता. हे अधिकारी विविध विविध विकास प्रकल्पांवर कार्यरत आहेत.

अभ्यास दौर्‍यात हैदराबादच्या प्रतिनिधींनी विशेषत: सायन्स पार्क, कम्युनिटी फार्मिंग, एनर्जाईझ, रिन्यू अशा स्मार्ट प्लेस-मेकिंग साइट्स तसेच जपानी पद्धतीचे पु.ल. देशपांडे उद्यान, संभाजी उद्यान आणि मत्स्यालय, वाडिया महाविद्यालयाजवळील रमाबाई आंबेडकर उद्यानांना भेट दिली. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी स्मार्ट सिटी ऑपरेशन्स सेंटर, औंध आणि जंगली महाराज रस्ता येथील स्मार्ट स्ट्रीट रीडिझाईन, ‘ती’ शौचालय हे प्रकल्प पाहिले.

पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. भेट देणाऱ्या अधिका्यांनी औंध-बाणेर-बालेवाडी (एबीबी) परिसरातील क्षेत्र-आधारित विकास प्रकल्प आणि स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पॅन सिटी प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती घेतली.

हैदराबादचे महापौर बोन्तू राममोहन म्हणाले, “पुणे स्मार्ट सिटीने अनेक वापरात नसलेल्या छोट्या जागांचे रुपांतर उपयुक्त स्मार्ट ठिकाणांमध्ये केले आहे. हे प्रशंसनीय काम असून, या प्रकल्पांचा अभ्यास करून आमच्या यंत्रणेमार्फत हैदराबादमध्ये असे प्रकल्प राबविण्याचा आमचा मानस आहे.”

पीएससीडीसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कु. रुबल अग्रवाल यांनी उद्धृत केले की, “पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध राज्यांतील अग्रगण्य शहरांतील प्रशासकीय अधिकारी पुण्याचे अनुककरण करण्यास उत्सूक आहेत.”

हैदराबादच्या क्षेत्रीय आयुक्त सुश्री हरिचंदना दासरी म्हणाल्या, “पुणे स्मार्ट सिटीने यशस्वीरित्या राबविलेले पथदर्शी प्रकल्प आम्हाला विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मागर्दर्शक आहेत. त्या अनुषंगाने आम्ही अंमलबजावणीसाठी उत्सूक आहोत.”

Exit mobile version