नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरं जाणारे ते अँड्रयू जॅक्सन आणि बिल क्लिंटन यांच्यानंतरचे तिसरे अध्यक्ष ठरले आहेत.
सत्तेचा गैरवापर केल्याचा आणि युक्रेनसोबतच्या व्यवहारासंदर्भात अमेरिकी काँग्रेसच्या कामात अडथळे आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आजच्या मतदानामुळे ट्रंप यांची सुनावणी अमेरिकेच्या सिनेटमध्ये होईल आणि त्यांनी पदावर राहावं की राहू नये ते निश्चित होईल.
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात झालेल्या सुनावणीच्या वेळी डेमोक्रेटिक पक्षाच्या बहुतेक सर्व सदस्यांनी ट्रंप यांच्याविरोधात मतदान केलं. त्यापूर्वी या संदर्भात सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. मतदान सुरू असताना डोनाल्ड ट्रंप मिशिगन इथं उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्यासोबत प्रचार सभा घेत होते.