Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उच्च न्यायालयात केलं सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठासमोर सादर केलं. सिंचन घोटाळ्याप्रकरणी सिंचन विभागाशी संबंधित दोन हजार ६५४ निविदांची चौकशी सुरु आहे.

यातल कोणत्याही प्रकरणांशी अजित पवार यांचा काही संबंध नसल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. मात्र न्यायालयानं याबाबत काही आदेश दिला, तर याप्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते, असंही विभागानं सांगितलं.

भारतीय जनता पार्टीनं मात्र अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेल्या क्लिनचीटला विरोध केला आहे. पक्ष या विरोधात पुन्हा कोर्टात जाऊ शकतो, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विभागाचं हे प्रतिज्ञापत्र दिशाभुल करणारं आहे, ते न्यायालयात टिकणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

Exit mobile version