मुंबई (वृत्तसंस्था) : स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत गाडगेबाबा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. नांदेड इथं, गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा, महाविद्यालये, ग्राम पंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
कंधार तालुक्यात महात्मा फुले माध्यमिक शाळेत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. वाशिम जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘ माझं वाशिम, स्वच्छ वाशिम’ या अंतर्गत शहरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यामध्ये विविध सामाजिक संघटना तसंच महिला गटांसह वाशिम नगर परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पवन बनसोड यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
अमरावती इथं संत गाडगेबाबा विद्यापीठाचा छत्तीसावा दीक्षांत समारंभ आज साजरा होत आहे. कुलपती महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.