मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात बुधवारी सकाळी जिलेटीनच्या पाच कांड्या सापडल्याने खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर रिकामा केला आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. जिलेटीनच्या कांड्या असलेल्या बॅगसोबत एक पत्रही सापडले असून ‘आपण काय करु शकतो हे भा.ज.पा. सरकारला दाखवायचे आहे’, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
शालिमार येथून लोकमान्य टिळक टर्मिनसला (एल.टी.टी.) येणारी शालिमार एक्स्प्रेस बुधवारी सकाळी एल.टी.टी.स्थानकात पोहोचली. यानंतर एक्स्प्रेस साफसफाईसाठी यार्डात नेण्यात आली. डब्यांमधील साफसफाईचे काम सुरु असताना कर्मचाऱ्यांना एका बॅगेत जिलेटिनच्या पाच कांड्या सापडल्या. कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी घेत जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. दुसरीकडे बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनसचा परिसर रिकामा केला असून टर्मिनसमध्ये कसून तपासणी केली जात आहे.
जिलेटीनच्या कांड्यांसोबत एक पत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे. या पत्रातून भा.ज.पा. सरकारला धमकी देण्यात आली आहे. या पत्रात म्हटले आहे की, “तुम्हाला हे पार्सल फक्त दिशाभूल करण्यासाठी ठेवायचे आहे. तुम्हाला चार लोकांनी हे पार्सल दिले असून ते ठरलेल्या तारखेला योग्य ठिकाणी ठेवायचे आहे. तुमच्यावर कोणीही शंका घेणार नाही. पार्सल ठेवल्यानंतर तुम्ही दोघे जण पुन्हा मध्य प्रदेशमध्ये निघून जा. आपण काय करु शकतो हे भा.ज.पा. सरकारला दाखवायचे आहे.