उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू नवी दिल्लीत एका कार्यक्रमात 66 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरित करतील. ‘हेलारो’ या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला जाणार आहे. अभिनेते आयुष्यमान खुराना याला अंधाधुंन तर विकी कौशल याला उरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं गौरवलं जाईल.
महानती या तेलगू चित्रपटातल्या सावित्रीच्या भूमिकेसाठी कीर्ती सुरेश हीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जाणार आहे. ‘उरी-द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटासाठी अदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला जाणार आहे. ‘बधाई’ हो या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट ‘मनोरंजनपर’ चित्रपट म्हणून निवड झाली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तर गायक आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. अक्षय कुमार अभिनित ‘पॅडमॅन’ या चित्रपटाची सामजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे.
संजय लीला भंसाली यांना ‘घुमर’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला जाणार आहे, तसंच सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कारही भंसाली यांना दिला जाणार आहे. पदमावत चित्रपटातील ‘बिंते दिल’ या गाण्यासाठी अरिजित सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्व गायकाचा तर बिंदू मालिनी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्व गायिकेचा पुरस्कार प्रदान केला जाईल. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘पाणी’ या मराठी चित्रपटानं मिळवला आहे.
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कार ‘ओंडाला इराडाला’ या कन्नड चित्रपटाला मिळाला आहे. उत्तराखंडला सर्वोत्कृष्ट चित्रपट स्नेही राज्य पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.