नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीनं बाजी मारल्याचं चित्र दिसत आहेत. मतमोजणी सुरु असून जे कल समोर येत आहेत त्यात या आघाडीनं निम्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे.
81 जागांपैकी आतापर्यंत 47 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात भाजपानं 14, काँग्रेस 11, झारखंड मुक्ती मोर्चा 17, ऑल झारखंड स्टुडंट युनियन दोन, तर सीपीआय एमएलनं एक जागा जिंकली आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीच्या विजयानं झारखंडच्या इतिहासात नवीन अध्याय सुरु होईल, असं मत मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार तसंच झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी व्यक्त केलं आहे.
महाआघाडी सरकार स्थापनेनंतर राज्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. आघाडीचे घटक पक्ष लवकरच बैठक घेऊन पुढच्या योजना ठरवतील, असंही सोरेन यांनी सांगितलं. महाआघाडीवर विश्वास दाखवल्याबद्दल सोरेन यांनी जनतेचे आभार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हेमंत सोरेन यांचं अभिनंदन केलं असून राज्याची सेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. झारखंडमधल्या मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत.