नेता निवडीसाठी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीनं सत्ता संपादन केली आहे. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत या आघाडीनं ४७ जागा जिंकल्या आहेत, त्यात झारखंड मुक्ती मोर्चा ३०, काँग्रेस १६, राष्ट्रीय जनता दलाच्या एका जागेचा समावेश आहे.
भाजपानं २५, झारखंड विकास मोर्चा तीन, ऑल झारखंड स्टुडंटृस युनियननं दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय एमएलनं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी दुमका आणि बारहैत या दोन्ही मतदारसंघांमधून विजय मिळवला.
झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी धनवारमधून निवडुन आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर आरोवन यांनी लोहारडागा, तर ए.जे.एस.यूचे अध्यक्ष सुरेश महातो यांनी सिल्लीची जागा जिंकली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण गिल्लवा चक्रधरपूरमधे पराभूत झाले. राजू पलिवार आणि लुईस मरांडी हे दोन मंत्रीही पराभूत झाले. मुख्यमंत्री रघुबर दास यांनी राजीनामा दिला आहे. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं, असं राज्यपालांनी त्यांना सांगितलं आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीच्या विजयानं झारखंडच्या इतिहासात नवीन अध्याय सुरु होईल, असं मत मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार तसंच झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी व्यक्त केलं आहे. महाआघाडी सरकार स्थापनेनंतर राज्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल.
आघाडीचे घटक पक्ष लवकरच बैठक घेऊन पुढच्या योजना ठरवतील, असंही सोरेन यांनी सांगितलं. महाआघाडीवर विश्वास दाखवल्याबद्दल सोरेन यांनी जनतेचे आभार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हेमंत सोरेन यांचं अभिनंदन केलं असून राज्याची सेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
झारखंडमधल्या मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपला पक्ष जनादेशाचा आदर करत असल्याचं ट्विट केलं आहे. पक्ष कार्यकर्त्यांचे तसंच राज्यातल्या जनतेचे त्यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी त्यांची आज बैठक होणार आहे.