नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणं आवश्यक असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अटल भूजल योजनेचा आज नवी दिल्लीत प्रधामंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.
शेतीत पिकांसाठी गरजेपुरतेच पाणी वापरण्याची, कमी पाण्यात येणारी पिकं घेण्याची तसंच ठिबकसिंचन आणि तुषारसिंचनाद्वारे ऊसाची शेती करण्याची आवश्यकता प्रधामंत्र्यांनी व्यक्त केली. गुजरातमध्ये ऊसासाठी तुषारसिंचन पद्धत बंधनकारक केल्यानंतर ऊसाचं उत्पादन वाढलं, शिवाय साखरेचा उताराही वाढल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सर्व गावांनी पाण्याचा ताळेबंद तयार करावा, असं आवाहन करतानाच, जी ग्रामपंचायत पाण्याचं योग्य नियोजन करेल, त्या ग्रामपंचायतीला प्रोत्साहनपर वाढीव निधी दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमात, जलजीवन मिशनसाठीचे दिशानिर्देशही प्रधानमंत्र्यांनी जारी केले. लद्दाख मधलं लेह आणि हिमाचल प्रदेशातल्या मनालीला जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याचं अटल बिहारी वाजपेयी बोगदा असं नामकरण आज करण्यात आलं.
आठ किलोमीटर आठशे मीटर लांबीच्या या बोगद्यामुळे मनाली आणि लेहमधलं अंतर शेहेचाळीस किलोमीटरने कमी होणार आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी, अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत, देशवासियांना नाताळ सणाच्याही शुभेच्छा दिल्या.