नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनकर्त्या हिंसक लोकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फटकारलं आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्या-या आंदोलकांनी आपलं कृत्य बरोबर की चूक याचा गंभीरपणे विचार करावा कारण हक्क आणि कर्तव्य ही नेहमी हातात हात घालून येतात, हे त्यांनी विसरु नये.
लखनौ इथं माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात बोलत होते. लखनौच्या लोकभवन परिसरात उभारलेल्या माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींच्या २५ फुटी कांस्यप्रतिमेचं यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. प्रगतीची वाटचाल यशस्वी करत आपण २०२० सालाकडे चाललो आहोत. जनतेपुढे येणा-या संकटांचं निवारण करण्याचा सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. ३७० कलम, रामजन्मभूमी विवाद अशा दीर्घकाळच्या समस्यांवर आपण शांततापूर्ण रीतीने तोडगा काढला.
पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा करुन त्याही समस्येवर इथल्या जनतेने उपाय केला. अटल भूजल योजनेचाही काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आरंभ झाला. शेतक-यांनीही शेतीची नवी तंत्र आत्मसात करुन कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीकं घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं.
हिमाचल प्रदेशातल्या मनाली- लेह मार्गावरच्या रोहतांग बोगद्याचं ‘अटल टनेल’ असं काल नामकरण करण्यात आलं. हा बोगदा बांधण्याचं काम २ हजार सालात वाजेपयीजी प्रधानमंत्री असताना हाती घेण्यात आलं होत.