नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावर विरोधक चुकीची माहिती पसरवत असून प्रतिमा मलिन करणारी मोहिम राबवत आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केला.
जम्मूमध्ये पत्रकारांशी बोलताना, वरिष्ठ भाजप नेते राम माधव म्हणाले की, काँग्रेसप्रणित विरोधी पक्ष देशाच्या विविध भागांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावर जातीय तणाव निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणाले. या कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या अपप्रचाराच्या मोहिमेस जम्मू-कश्मीरच्या जनतेनं बळी पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
काश्मिर खो-यात स्थिती झपाट्यानं सामान्य होत आहे, असं त्यांनी सांगितलं. आता जम्मू-कश्मीरमधील केवळ तीस ते बत्तीस प्रमुख नेते खबरदारीचा उपाय म्हणून स्थानबद्ध आहेत, असंही त्यांनी सांगितलं. एकूण शंभर जण स्थानबद्धतेत असून त्यांचीही टप्प्याटप्प्यानं सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. इंटरनेटवरील बंदी उठवण्याविषयी,भाजप नेते म्हणाले की, कारगिलमध्ये आज पुन्हा इंटरनेट सेवा सुरू झाली आहे आणि जम्मू-कश्मीर खो-यात स्थिती अनुकूल झाल्यावर इंटरनेट सेवा सुरू केली जाईल.