Site icon साप्ताहिक एकच ध्येय

व्यंगनगरी मूक झाली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने मुख्यमंत्री यांना दु:ख

मुंबई : ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाने कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे. या क्षणाला ठाकरे कुटुंबातील एक सदस्य कायमचा दूर गेल्याचे दु:ख मनात आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी   व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांची पत्नी भारती, मुलगा परिमल तसेच परिवाराचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, विकास सबनीस यांनी कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी राजकीय परिस्थितीवर अचूक भाष्य करीत अनेकांना घायाळ केले. साप्ताहिक ‘मार्मिक’शी त्यांचे विशेष ऋणानुबंध होते. व्यंगचित्रामागे असलेला विचार ही त्यांची विशेष ओळख होती. रेषांच्या सहाय्याने राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्याच्या परिणामांचा विचारही त्या व्यंगचित्रामागे असे. स्व. बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्मण अशा महान व्यंगचित्रकारांकडून  प्रेरणा घेऊन या दोघांचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या निधनाने 50 वर्षे कलेची सेवा करणारा निष्ठावंत कला उपासक हरपला आहे.

Exit mobile version