रूपे आणि युपीआय च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर कुठलीही कर सवलत दिली जाणार नाही ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी नवीन वर्षापासून रुपे आणि युपीआय या देशी मंचावरुन केल्या जाणार्या आर्थिक व्यवहारांसाठी व्यापारी सवलतीचे दर लागू राहणार नाहीत, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. बँकिंग क्षेत्राला भेडसावणार्या समस्यांविषयी सीतारामन यांनी नवी दिल्ली इथं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेचे शीर्ष अधिकारी, विविध बँक संघटनांचे पदाधिकारी आणि खाजगी बँकांचे प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
डिजीटल व्यवहारांसाठी कुठलेही व्यापार सवलत दर रुपे आणि युपीआय या मंचावर नसतील, अशी अधिसूचना केंद्रीय महसूल विभाग लवकरच जारी करणार आहे. ५० कोटी अथवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सर्व कंपन्यांना आता रुपे डेबिट कार्ड तसंच युपीआयसाठी क्युआर कोड उपलब्ध करुन देणं बंधनकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एमडीआर अर्थात, व्यापारी सवलत दर म्हणजे ग्राहकांनी डिजीटल मंचावरुन केलेल्या व्यवहाराचे देयक स्विकारल्याबद्दल बँकेकडून आकारले जाणारे शुल्क आहे.