प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास ; स्वदेशी वस्तूच विकत घेण्याचं देशवासियांना केलं आवाहन…..
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवा भारत हा भारताच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. मन की बातच्या साठव्या कार्यक्रमात मोदी यांनी देश-विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधला. २१ व्या शतकात जन्मलेली युवा पीढी भारताला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, भारताच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान असेल, येणारं दशक हे युवकांचं कल्याण आणि विकास यावरच केंद्रित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताला आधुनिक बनवण्यातही युवा पीढीचं मोलाचं योगदान राहणार, आजची युवा पीढी ही हुशार आणि महत्त्वाकांक्षी असून, काहीतरी नवं करण्याच्या प्रयत्नात गुंतलेली आहे. चांगल्या निर्णयांच्या प्रतिक्षेत असलेली युवा पीढी सरकारला जाब विचारते हे सदृढ व्यवस्थेचं लक्षण आहे. नवीन पिढी कुठल्याही अराजकतेला थारा देणार नाही. चांगल्या प्रशासनाच्या आड येणा-या तसंच अस्थिरता, जातियता, प्रांतवाद, अनुकूलता, लैंगिक भेदभाव या सगळ्या गोष्टींना युवा पिढीचा विरोध आहे.
पुढच्या वर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे. हा दिवस युवादिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक युवकानं आपल्या कर्तव्याची जाण ठेवून चांगल्या भारत निर्माणाची शपथ घ्यावी. प्रत्येक नागरिकानं आत्मनिर्भर होऊन, अभिमानानं जगावं, असं ते म्हणाले. प्रत्येक भारतीयानं स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन, त्याच खरेदी कराव्यात, जेणेकरुन या स्थानिक कारागिरांची भरभराट होईल, असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं.
यासाठी उत्तर प्रदेशमधल्या फुलपूरच्या एका महिलेचं उदाहरण त्यांनी दिलं. या महिलेनं स्वयंप्ररणेनं पादत्राणे बनवण्याचा उद्योग सुरु केला आणि आता ग्रामीण आजिविका अभियानाअंतर्गत चपला बनवण्याचा मोठा कारखाना सुरु केला आहे. स्थानिक महिलांना पादत्राणे बनवण्याच्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्थानिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलं. या पोलिसांनी या महिलांकडून पादत्राणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंदांच्या स्मृती स्थळाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, तर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कच्छ इथल्या डेझर्ट महोत्सवाला भेट देण्याचं आवाहन केलं. मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून भारताच्या खगोलशास्त्र विषयीच्या प्राचीन ज्ञानाबद्दल जनतेनं माहिती करुन घ्यावी, असं आवाहन केलं.
खगोल क्षेत्रातल्या संशोधनासाठी सरकारनं पुणे, नैनिताल, लदाख, गुरु शिखर आणि देशातल्या इतर काही भागात आधुनिक दुर्बिणी लावल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो लवकरच अँँस्ट्रोसॅट आदित्य नावाचा उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या जनतेनंही खगोलशास्त्रातली आणखी ऊर्जा वाढवावी, असं आवाहन त्यांनी केलं.