Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘वढू’ गावच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील ; ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

पुणे : ‘वढू’ गावची ख्याती सर्वदूर असून या गावच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे सांगून ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

पेरणे जयस्तंभ येथील पूर्वतयारी पाहणी नंतर जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली वढू येथे ग्रामसभा झाली, यावेळी उपस्थित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांना उद्देशून ते बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गावच्या सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमेश शिवले तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी यावेळी वढू येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच मागील वर्षी जयस्तंभ अभिवादन दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून यावर्षी देखील ग्रामस्थांनी आपसात समन्वय राखून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच ग्रामस्थांनी मागणी केलेल्या विविध विकास कामासाठी प्रशासन सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले, या गावाचे नाव अभिमानाने उंचवावे यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्था तसेच हा अभिवादन सोहळा सुरळीतपणे पार पडण्याकरीता पोलीस विभाग सज्ज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याबैठकीला ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version