नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी व आयसीआयसीआय या बँकांचे डेबिट कार्ड जर आपण वापरत असाल व त्यात ईएमव्ही, मास्टरकार्ड व विसा नसेल, तर तुम्हाला नव्या वर्षाच्या सुरूवातीसच एटीएमधुन पैसे काढण्यास अडचण येऊ शकते. असे यामुळे होऊ शकते कारण, ३१डिसेंबर २०१९ नंतर तुमचे डेबिट कार्ड १ जानेवारी २०२० पासूनच ब्लॉक होऊ शकते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार सर्व भारतीय बँकांना आपल्या ग्राहकांना दिलेले मॅग्नेटिक डेबिट कार्ड बदलावे लागणार आहेत. बँकांना या कार्डच्या जागी नवे ईएमवी कार्ड द्यावे लागणार आहे. डेबिट कार्ड बदलण्याची ही प्रक्रिया अनिवार्य आहे. कारण, ती आंतरराष्ट्रीय पेंमेंट्सशी निगडीत आहे.
एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी व आयसीआयसीआय बँक व अन्य बँकांचे जे ग्राहक जुने डेबिट कार्ड किंवा मग मॅग्नेटिक डेबिट कार्ड वापरत आहेत, त्यांनी वेळेतच आपले कार्ड बदलवून घ्यावेत. अन्यथा त्यांचे कार्ड बंद होऊ शकते. महत्वाची बाब ही आहे की, हे कार्ड नव्या वर्षाच्या प्रारंभीच बंद होऊ शकतात. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यात मग्न असलेल्यांना देखील याचा फटका बसू शकतो.आरबीआयकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, सर्व बँकांना सगळे मॅग्नेटिक चीप असलेल्या डेबिट कार्डला ईएमव्ही आणि पीन आधारीत कार्ड्सशी बदलून घ्यावी लागेल.