Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पवना नदीची महाआरती

पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका, शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने पर्यावरणविषयक व्याख्यान व पवना नदीची महाआरती करण्यात आली.

यावेळी महापौर राहुल जाधव बोलत होते. यावेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, आबा मसूडगे, डॉ. निलेश लोंढे, वीरेंद्र चित्राव, माजी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, डॉ. मोहन गायकवाड, राजीव भावसार, सूर्यकांत मुथीयान, विकास पाटील, माणिक धर्माधिकारी, गणेश जवळकर, प्रवीण अहिर, अनिल घोडेकर, सिद्धार्थ नाईक, आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘मागील दहा वर्षांपासून शहराची लोकसंख्या वाढली. कंपन्या आणि पाण्याचा वापर देखील वाढला. त्यामुळे शहरातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी जाऊ लागले. शहरातील तिन्ही नद्या दूषित आहेत. मागील तीन वर्षांपासून त्यावर प्रभावी उपायोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्थांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पवनामाई वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नदी सुधार करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे सुरू आहे. त्यामध्ये नद्यांना पूर्वीच्या स्वच्छ आणि सुंदर नद्या पाहायला मिळतील. नद्यांच्या दोन्ही बाजूंनी बाग आणि अन्य सुविधा करण्यात येतील.

वीरेंद्र चित्राव म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. एकविसावे शतक हे पर्यावरणीय समस्यांचे असणार आहे. कारण मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. जागतिक तापमानवाढ मानवाच्या घरात दाखल झाले आहे. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारीच नाही तर काळाची गरज आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे, सांडपाणी नदीत न सोडणे अशा लहान-लहान गोष्टींमधून पर्यावरण रक्षण करता येईल.’

Exit mobile version