नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुर्याचा अभ्यास करता यावा यासाठी इस्रोनं एका उपग्रहाचं प्रक्षेपण करायची योजना आखली आहे, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना बोलत होते.
खगोल शास्त्राच्या क्षेत्रातला भारत एक प्रगत देश असून, या क्षेत्रात इस्रोनं अतुलनीय कामगिरी केली आहे, असंही मोदी यांनी म्हटलं. आपण सगळ्यांनी खगोल शास्त्राविषयीचं पूरातन ज्ञान आणि आधुनिक शोधांविषयी समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे.
देभातले युवा वैज्ञानिकांमध्ये भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास समजून घेण्याची तसंच खगोल शास्त्राला नवी दिशा देण्याची प्रबळ इच्छा दिसते असंही मोदी यांनी म्हटलं आहे. ग्रामीण भागातलं पर्यटन वाढावं यासाठी नागरिकांनी ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करण्याचा छंद जोपासावा असं आवाहनही त्यांनी केलं. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खगोलशास्त्रविषयक क्लब सुरु करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.