मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. 2 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांचे विशेष संचलन होणार असून इतर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
58 वर्षापूर्वी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना एका सोहळ्यात पोलीस ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून महाराष्ट्र पोलिसांना विशेष दर्जा मिळाला. त्यानिमित्त दर वर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. येत्या 2 जानेवारी रोजी मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानात पोलिसांचे विशेष संचलन होणार आहे. या संचलनात सुमारे 250 पोलीस सहभागी होणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त हर्ष फायरचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे. तसेच यावेळी पोलिसांच्या 200 जणांचा सहभाग असलेल्या बँड पथकाचे सादरीकरण होणार आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे होते, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.