Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताचे पहिले सीडीएस अर्थात, संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पहिले सीडीएस अर्थात, संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती झाली आहे. लष्करसंबंधी मुद्यांवर सीडीएस हेच सरकारचं सल्लागार असतील, तसंच लष्कर, हवाईदल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देतील.

जनरल रावत आज लष्कर प्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत. संरक्षण मंत्रालयानं लष्कर, हवाईदल आणि नौदला संदर्भातल्या नियमांमधे दुरुस्ती करत त्यात सीडीएस वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत सेवेत राहू शकतील, अशी तरतूद केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळानं सीडीएसचं पद नुकतच तयार केलं.

सीडीएसला लष्करप्रमुखांप्रमाणेच वेतन आणि सुविधा दिल्या जातील. ते लष्कर व्यवहार विभागाचे प्रमुख असतील. हा विभाग संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत तयार केला जाईल. सीडीएस हे सेनादलांच्या कर्मचारी समितीचे अध्यक्ष असतील. तिन्ही दलांच्या सर्व मुद्दयांवर संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणून ते काम करतील. तिन्ही दलांचे प्रमुखही आपापल्या विभागांशी संबंधित मुद्दयांवर संरक्षण मंत्रालयाला सल्ला देतील.

तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांबरोबर सीडीएस कोणत्याही दलाचं प्रमुखपद सांभाळणार नाहीत. वायफळ खर्च कमी करुन, सशस्त्र दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं सीडीएस तिन्ही दलांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील.

Exit mobile version