Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र देशाला दिशा देणारे राज्य – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई 1 : महाराष्ट्र राज्य हे देशाला  नवी  दिशा देण्यासाठी मार्गदर्शक ठरु शकते. यासाठी विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असते. यासाठी राज्याच्या विधिमंडळ कामकाजाची ही यशस्वी परंपरा पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करुया, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधीमंडळ सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांना केले.

श्री.पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी-कर्मचारी व कल्याण केंद्राच्या विद्यमाने नूतन वर्ष-२०२० अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन आज विधानभवन येथील मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री. पटोले म्हणाले, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या मासिकाच्या धर्तीवर विधानमंडळातील अधिकारी-कर्मचारी यांना लिखाणाची संधी मिळावी, यासाठी विधिमंडळपत्रिका या नावाने त्रैमासिक सुरू करू. मनातील संकल्पना साध्य करण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळ कामकाजात सुधारणा करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करून महाराष्ट्राची परंपरा उंचीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्री.पटोले यांनी उपस्थित मान्यवर अधिकारी-कर्मचारी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, मेघना तळेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, विधिमंडळ ग्रंथपाल बाबा वाघमारे, राजपत्रित अधिकारी संघटनेच्या उपाध्यक्ष आरती बापट, विधिमंडळ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष भावना महाळेश्वर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version