Site icon साप्ताहिक एकच ध्येय

धानाच्या तात्काळ परताव्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

मुंबई : विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान हे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात यावे. धान खरेदीनंतर तात्काळ त्याचा परतावा मिळावा यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना असून, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

आज विधानभवनात शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विक्रेंद्रित खरेदी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. पटोले बोलत होते.

श्री. पटोले म्हणाले, शासनाच्या योजना या शेतकऱ्यांसाठी असून, त्यांना न्याय मिळावा या पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. किमान आधारभूत किंमत केंद्रावरील शेतकऱ्यांचे धान पावसाने खराब होऊ नये यासाठी जलद गतीने खरेदी करावे. धान खरेदीनंतर सात दिवसामध्ये शेतकऱ्यांना त्याचा परतावा देण्यात यावा. उपलब्ध ॲपमध्ये सुधारणा करून, शेतकऱ्यांना यासंदर्भात सूचना देण्यात यावी. भविष्यात धान साठून राहू नये आणि शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो परतावा मिळावा आणि धान खराब होऊ नये, यासाठी वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी आणि संबंधित संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा आणावी, असेही श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

यावेळी बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version