मुंबई : जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने आपणास काम करावयाचे आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना गती देऊन ती कामे विहित वेळेत पूर्ण कसे होतील याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे असे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच. बघाटे तसेच जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री.सामंत यांनी आज विधानभवन येथील दालनात रत्नागिरी जिल्ह्यातील नियोजन विभागाचा आढावा तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पाणीपुरवठा योजना आढावा, जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेबाबत आढावा, तिवरे धरण पुनर्वसन व सद्यस्थितीबाबत आढावा. त्याचप्रमाणे माचाल हे नूतन पर्यटन स्थळ निर्मितीबाबत आढावा आणि गणपतीपुळे येथे विविध विकास कामांच्या संदर्भात आढावा बैठक घेऊन कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. जिल्हा नियोजन अंतर्गत असलेली सर्व विकास कामे तातडीने मार्गी लावावीत, ती पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असलेल्या कामांचा आढावा घेताना या कामांबद्दल अचूकता व पारदर्शीपणा ठेवून उत्तम रितीने कामे होतील याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
तिवरे धरणासंदर्भात आढावा घेताना लोकांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडविण्यास प्रशासनाने पुढाकार घ्यावा. आवश्यकता भासल्यास संबंधित बाधितांना आपण स्वत: भेटून समक्ष त्यांचे प्रश्न सोडविण्यास मदत करु, असे श्री.सामंत म्हणाले. माचाल हे नूतन पर्यटन स्थळ म्हणून निर्माण होत असल्याने याकडे विशेष लक्ष द्यावे. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती वा संस्थांचे मार्गदर्शन घेऊन पर्यटन आराखडा तयार करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. गणपतीपुळे हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून या गावातील विकास कामांबद्दल अधिक जागरुकता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील रस्ते, पाणी व विविध कामे याचाही त्यांनी आढावा घेतला.